भंडारदरा धरण शताब्दी महोत्सव साजरा होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय आयोजन — ना. राधाकृष्ण विखे

अकोले — अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या राज्य सरकारने मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने आगामी एक वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे.


या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. या बैठकीत महोत्सवाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने भंडारदरा–निळवंडे परिसराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, यावर सखोल चर्चा केली.
धरणाचा शताब्दी महोत्सव शासन आणि लोकसहभागातून व्यापक स्वरूपात साजरा करावा, अशी संकल्पना यावेळी निश्चित करण्यात आली. या बैठकीस आमदार श्री. अमोल खताळ, माजी आमदार श्री. वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक श्री. अमित भांगरे, श्री. मारुती मेंगाळ उपस्थित होते.
यासोबतच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता श्री. प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता श्री. बाळासाहेब शेटे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




