नाशिक–पुणे रेल्वे मार्ग थेटच असावा
खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे ठाम मागणी

नवी दिल्ली / शिर्डी :
नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा शिर्डीमार्गे वळवलेला नवा आराखडा तातडीने पुनर्विचारात घ्यावा आणि सिन्नर–संगमनेर (अकोले)–नारायणगाव–मंचर–चाकण मार्गे थेट नाशिक–पुणे रेल्वे जोडणी करण्यात यावी, अशी ठाम व आग्रही मागणी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मंगळवार (दि. १६ डिसेंबर) रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीत खासदार वाकचौरे यांच्यासोबत खा. राजाभाऊ वाजे, खा. अमोल कोल्हे व खा. भास्कर भगरे उपस्थित होते. या सर्व खासदारांनी नाशिक व पुणे या दोन प्रमुख औद्योगिक, शैक्षणिक व कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणीची मागणी दशकानुदशके प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले.
संसदेत दिलेल्या उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी नारायणगावजवळील Giant Metrewave Radio Telescope (GMRT) या संवेदनशील रेडिओ क्षेत्रामुळे प्रस्तावित मार्ग शिर्डी व अहिल्यानगरमार्गे वळवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, खासदारांनी या बदलामुळे प्रकल्पाचा मूळ उद्देशच धूसर होत असल्याचे सांगितले.
“नाशिक–पुणे हा मार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा कणा आहे. या दोन शहरांदरम्यान लाखो कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक व शेतकरी रोज प्रवास करतात. शिर्डीमार्गे वळवणी झाल्यास प्रवासाचा कालावधी वाढेल, खर्च वाढेल आणि औद्योगिक विकासावर प्रतिकूल परिणाम होईल,” असे स्पष्ट मत खासदार वाकचौरे यांनी मांडले.
थेट मार्गानेच रेल्वे जोडणी झाल्यास उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. नाशिक व पुणे जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी व उद्योजक वर्गाच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.




