
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने ऐतिहासिक विजय मिळवत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची ठरलेली ही निवडणूक मतदारांनी स्पष्टपणे तांबे–थोरात गटाच्या बाजूने झुकवली.
सेवा समितीचा निर्विवाद दबदबा
नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 30 पैकी तब्बल 27 जागांवर संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. शिंदे शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली असून, दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे संगमनेर शहरावरील तांबे–थोरात यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नगराध्यक्षपदी डॉ. मैथिली तांबे
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट लढतीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनी 16 हजार 400 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. विरोधकांचे सर्व अंदाज फोल ठरवत त्यांनी संगमनेरच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे.
बदलत्या समीकरणांवर तांबेंची मात
विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर संगमनेरमधील राजकीय समीकरणे बदलतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र घेत संगमनेर सेवा समितीची स्थापना करून ही निवडणूक लढवली आणि आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.
विरोधकांची रणनीती निष्फळ
शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी भावजय सुवर्णा खताळ यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारालाही अपेक्षित यश मिळू शकले नाही.
शहरात जल्लोषाचे वातावरण
निकाल जाहीर होताच संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. या निकालामुळे संगमनेर नगरपरिषद निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, दोन प्रभावशाली राजकीय घराण्यांतील अस्तित्वाची लढाई ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.




