अफवांमुळे सोयाबीन दरात घसरण; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर – (सुदिन न्यूज) अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे भारताने कृषी बाजारपेठ खुली केली असल्याच्या अफवा सध्या पसरवल्या जात आहेत. मात्र या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसून, सरकारने कृषी बाजार खुली करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
काही लोक जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवत असल्यामुळे सोयाबीन बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोयाबीन बाहेरून आयात केले जाणार, अशा प्रचारामुळे दर ५०० रुपयांनी घसरल्याचे दिसून आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, भारत-अमेरिका व्यापार करारांतर्गत सोयाबीन तसेच डी-डीडीजीएस (DDGS) आयातीस कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच अमेरिका किंवा कोणत्याही युरोपीय देशांसाठी कृषी बाजार खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही.
ते येथे आयोजित ‘महाएग्रो २०२६’ पशुप्रदर्शनात बोलत होते. राज्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असून, मराठवाड्यातील बंद पडलेले दुग्धव्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
आठवडाभरात चारशे रुपयांनी दरात घट
गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमरावती, लातूर, अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत.
७ फेब्रुवारी रोजी अमरावती बाजारात सोयाबीनला सरासरी ६,३९९ रुपये, तर अकोल्यात ६,६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी अमरावतीत ६,०२७ रुपये, अकोल्यात ६,३८० रुपये आणि लातूरमध्ये ६,३०० रुपये दर नोंदविण्यात आला.
सध्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.




