श्री. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात चौथी राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धा उत्साहात संपन्न

संगमनेर, ( सुदिन न्यूज) : स्वर्गीय श्री. ओंकारनाथ मालपाणी स्मारक अंतर्गत संस्थापक कार्याध्यक्ष ॲड. हिंमतलाल शहा स्मृती करंडक चौथ्या राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर येथे करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध विधी महाविद्यालयांमधील एकूण १८ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धेला राज्यस्तरीय दिमाख प्राप्त करून दिला.
उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अर्पुब कुमार शर्मा (कार्यकारी सदस्य, भारतीय बार परिषद, नवी दिल्ली) उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मणियार, प्रा. डॉ. प्रताप फलफले, स्पर्धा समन्वयक प्रा. देवयानी निकम आणि डॉ. राहुल देशमुख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. संजय मणियार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्दिष्ट, विद्यार्थ्यांच्या न्यायनिवाडा कौशल्यांचा विकास आणि न्यायप्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव यांचे महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटनप्रसंगी मा. ॲड. अर्पुब कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या ज्ञान व कौशल्यांना परिष्कृत करावे, असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. संजय मालपाणी यांनी स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आत्मविश्वासाचे बक्षीस निश्चितच लाभते आणि तेच त्यांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देणारे ठरते, असे प्रतिपादन केले.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी मा. ॲड. नानासाहेब शेरमाळे, मा. ॲड. राजू खरे, मा. ॲड. गोरक्षनाथ कापकर, मा. ॲड. संदीप घुले, मा. ॲड. नंदकुमार काळे आणि मा. ॲड. निखील वाकचौरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अंतिम फेरीचे परीक्षण मा. ॲड. के. डी. धुमाळ आणि मा. डॉ. मोनिका शेरावत यांनी केले. सर्व संघांनी अत्यंत उत्कृष्ट आणि व्यावसायिक पद्धतीने आपले युक्तिवाद सादर करून स्पर्धेची उंची अधिक वृद्धिंगत केली.


पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. जगन्नाथ वामन (अध्यक्ष, संगमनेर वकील संघ) उपस्थित होते. तसेच मा. ॲड. के. डी. धुमाळ, मा. डॉ. मोनिका शेरावत आणि डॉ. संजय मालपाणी यांचीही उपस्थिती लाभली. आपल्या मनोगतात ॲड. जगन्नाथ वामन यांनी वकील व्यवसायात सतत अध्ययन आणि अद्ययावत ज्ञान संपादन करणे अत्यावश्यक असल्याचा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. तसेच प्रामाणिकपणा हा वकिली व्यवसायाचा कणा असल्याचे प्रतिपादन केले.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, कराड यांनी, द्वितीय पारितोषिक माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी, तर तृतीय पारितोषिक शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे यांनी पटकाविले. तसेच ‘सर्वोत्कृष्ट वकील’ म्हणून यश वरकड (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन पठारे व प्रा. डॉ. कपिल चौरपगार यांनी प्रभावीपणे केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. देवयानी निकम यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. बालाजी नरवटे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षकवृंद, कार्यालयीन अधीक्षक श्री. सचिन वालझाडे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




