संगमनेरमध्ये स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
रविवारी अचानक स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे तब्बल एक तास बंद

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मात्र रविवारी अचानक स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे तब्बल एक तास बंद पडल्याने शहरात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक तातडीने क्रीडा संकुलात दाखल झाले.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रभाग १ ते १५ मधील सर्व ईव्हीएम यंत्रणा उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. सुरक्षेचा भाग म्हणून संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. परंतु रविवारच्या दिवशी हे कॅमेरे काही काळ बंद राहिल्याचे समोर आल्यावर नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती होताच संगमनेर सेवा समितीचे विश्वासराव मुर्तडक, किशोर पवार, महेश खटाटे, प्रवीण अभंग, अमित गुंजाळ, सौरभ कासार, सचिन सातपुते, लाला खान पठाण, नूर मोहम्मद शेख, अमजद पठाण, सागर कानकाटे, संदीप लोहे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रीडा संकुलाबाहेर अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली.
सध्या देशभरात ईव्हीएम विषयी शंका-संशयाचे वातावरण असताना, संगमनेरमधील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले. कॅमेरे बंद का झाले याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने काही नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. अखेर संबंधित अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले, परंतु स्पष्ट उत्तर न मिळाल्याने वातावरण तंग राहिले.
या घटनेचे पडसाद तालुक्यात तसेच जिल्ह्यात उमटले आहेत आणि ईव्हीएम सुरक्षेवरील प्रश्नचिन्ह अधिक गंभीर झाल्याची भावना व्यक्त होत आहे.


माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “देशभर सत्ताधारी ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकत असल्याचे आरोप होत आहेत. असे असताना संगमनेरमध्ये स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे एक तास बंद राहणे हे गंभीर प्रकरण आहे. प्रशासनावर काही दबाव होता का, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडली पाहिजे.”




