नाशिक–पुणे थेट रेल्वेसाठी सर्वपक्षीय एल्गार; आंदोलनाची दिशा ठरली
सर्वपक्षीय विचारमंथन बैठकीसाठी आजी-माजी आमदार, खासदार, रेल्वे कृती समित्यांची उपस्थिती

संगमनेर – (प्रतिनिधी) नाशिक–पुणे थेट रेल्वेसाठी सर्वपक्षीय विचारमंथन बैठकीसाठी आजी-माजी आमदार, खासदार, रेल्वे कृती समित्यांची उपस्थिती; जनआंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली,नाशिक–पुणे थेट रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर आज पुणे ते नाशिक या संपूर्ण पट्ट्यातील आजी-माजी आमदार, खासदार आणि विविध रेल्वे कृती समित्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण विचारमंथन बैठक पार पडली. या बैठकीला सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक व पुणे ही दोन्ही शहरे राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे असून, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सक्षम वाहतूक व्यवस्था मिळणे, विद्यार्थी व नोकरदार वर्गाचा प्रवास सुलभ होणे आणि प्रादेशिक विकासाला चालना देणे यासाठी नाशिक–पुणे रेल्वे मार्ग पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे थेट (सरळ मार्गे) होणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी एकमताने मांडण्यात आले.
या प्रकल्पासाठी यापूर्वी सुमारे १००० कोटी रुपयांचा खर्च करून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पातून माघार न घेता, तो थेट मार्गानेच पूर्ण करावा, अशी ठाम भूमिका या बैठकीत घेण्यात आली. या उद्देशाने मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी आणि विविध तालुक्यांतील रेल्वे कृती समित्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.


आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात, येत्या ६ जानेवारीच्या आत सर्व प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिक–पुणे थेट रेल्वे संदर्भातील भूमिका स्पष्टपणे मांडणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे, खा. राजाभाऊ वाजे, मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा. भाऊसाहेब वाकचौरे, मा. खा. सदाशिवराव लोखंडे सहभागी झाले होते. तसेच आ. शरद सोनवणे, आ. सत्यजीत तांबे, आ. बाबाजी काळे, मा. आ. अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, सौ. नीलम अमोल खताळ, मा. उत्कर्षा रूपवते, मा. उदय सांगळे, कॉ. अजित नवले, मा. विनय सावंत, कॉ. कारभारी नवले, मा. बाजीराव दराडे, मा. कपिल पवार, मा. दत्ता ढगे, अकोले तालुका रेल्वे कृती समितीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिल्लीपर्यंत पाठपुरावा
नाशिक–पुणे रेल्वे ही पुणे–चाकण–नारायणगाव–संगमनेर–अकोले–सिन्नर–नाशिक या थेट मार्गानेच जावी, यासाठी दिल्लीपर्यंत सर्व प्रतिनिधी एकत्रितपणे पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.




