E-Paperलोकल न्यूज़

संगमनेर येथे विश्वकर्मा समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात; भव्य मिरवणुकीत समाजबांधवांचा मोठा सहभाग

संगमनेर : (सुदिन न्यूज) संगमनेर येथे विश्वकर्मा समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात; भव्य मिरवणुकीत समाजबांधवांचा मोठा सहभाग
संगमनेर शहरात विश्वकर्मा समाजाच्या वतीने विश्वकर्मा भगवान  जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत समाजातील सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून पारंपरिक व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि भगवान विश्वकर्मांच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. समाजातील युवकांनी मिरवणुकीचे नियोजन अत्यंत नीटनेटकेपणे केले होते.
या मिरवणुकीत ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास गोरे, राजू खरे यांच्यासह समाजातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच समाजातील महिला भगिनींची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
सालाबादप्रमाणे ही मिरवणूक स्वर्गीय आप्पा केसेकर यांच्या निवासस्थानी पोहोचली असता वातावरण भावुक झाले. दरवर्षी या ठिकाणी मिरवणुकीचे आत्मीयतेने स्वागत करणारे आप्पा केसेकर आज आपल्यात नसल्याने, उपस्थित समाजबांधवांच्या मनात हळहळ व्यक्त झाली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास गोरे सर यांनी, “विश्वकर्मा समाजासाठी सदैव योगदान देणारे आप्पा केसेकर यांचे मार्गदर्शन आणि प्रेम आजही आम्हाला जाणवते. त्यांच्या अनुपस्थितीची उणीव कायम भासत राहील,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी भारतभाऊ, जालिंदर, उदय, प्रशांत, अंकुश आदी केसेकर बंधूंनी मिरवणुकीचे स्वागत करत सामाजिक परंपरा जपली. त्यानंतर उपस्थित सर्व समाजबांधवांनी स्वर्गीय आप्पा केसेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी समाजातील मान्यवरांनी विश्वकर्मा समाजाच्या एकतेवर, सामाजिक सलोखा जपण्यावर आणि पुढील पिढीला संस्कार देण्यावर भर दिला. विश्वकर्मा जयंती केवळ उत्सव न राहता समाजबांधवांना एकत्र आणणारा प्रेरणादायी प्रसंग असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम शांततामय वातावरणात, उत्साह आणि शिस्त राखत पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!