टॉप न्यूज़लोकल न्यूज़शेतीसंगमनेरसामाजिक

रब्बी हंगाम व पशुधन वाचविण्यासाठी निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा-  निळवंडे पाटपाणी कृती समितीची मागणी

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका! पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आवर्तन सोडण्याचे नियोजन करावे. अन्यथा लाभक्षेत्रातील शेतकरी कोणत्याही क्षणी संबंधित कार्यालयावर मोर्चा घेऊन येतील, असा इशाराही निळवंडे पाटपाणी कृती समितीने दिला आहे.

संगमनेर (प्रतिनिधी) : निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी रब्बी पिकांची उभारणी करणे कठीण झाले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुधनाचे हित लक्षात घेऊन निळवंडे धरणातून रब्बी हंगामासाठी तसेच जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध होण्यासाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी लाभक्षेत्राला मिळाले होते. मात्र, या पाण्याला जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. दरम्यानच्या काळात परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर रब्बी पिकांची पेरणी व उभारणी करण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.

रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून पाणी मिळण्यास आणखी विलंब झाल्यास पेरणीचा आणि पिकांच्या वाढीचा महत्त्वाचा कालावधी हातातून निघून जाण्याची भीती आहे. त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पशुधन जगविण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्याची उपलब्धताही अडचणीत येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर निळवंडे धरणातून होणारे पुढील आवर्तन कोणताही विलंब न करता दि. २० नोव्हेंबर २०२६ च्या दरम्यान सोडण्यात यावे, अशी ठाम मागणी समितीने केली आहे. पाणी वेळेत उपलब्ध झाले तरच रब्बी पिकांना संजीवनी मिळेल आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. अन्यथा रब्बी हंगाम हातातून जाण्याबरोबरच पशुधनाचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका! पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आवर्तन सोडण्याचे नियोजन करावे. अन्यथा लाभक्षेत्रातील शेतकरी कोणत्याही क्षणी संबंधित कार्यालयावर मोर्चा घेऊन येतील, असा इशाराही निळवंडे पाटपाणी कृती समितीने दिला आहे.

या निवेदनावर प्रभाकर आनंदा गायकवाड, प्रल्हाद लहानु गागरे, रंगनाथ धोंडीबा लोंढे, केशव सदाशिव मुसमाडे, मच्छिंद्र काळे, एम. डी. घोरपडे, विलास रंगनाथ गुळवे, अण्णासाहेब बजाबा वाघे, विजय रामचंद्र मगर आणि संतोष त्रिंबक राऊत यांची नावे आहेत. समितीचे अध्यक्ष नानासाहेब रेवजी शेळके, उपाध्यक्ष उत्तम भैरू घोरपडे आणि सचिव अण्णासाहेब वाघे यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!