
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेताना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना रेशन वितरणाच्या वेळी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी दिव्यांग सारथी संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केली. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार खताळ पाटील यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत संगमनेर तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांबाहेर दिव्यांगांना रेशन घेताना प्राधान्य देण्याबाबतचे फलक लावण्याच्या सक्त सूचना दिल्या.
दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन घेताना दुकानां मध्ये रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन दिव्यांग सारथी संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी दिव्यांगांना रेशन वितरणात प्राधान्य मिळावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने आमदारांनी पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाबाहेर दिव्यांगांना रेशन वितरणात प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करणारे फलक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.आमदार खताळ पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्येची तात्काळ दखल घेतल्याने दिव्यांग सारथी संघटनेच्या सर्वच दिव्यांग बांधवांनी त्यांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना रेशन घेताना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्याची केली मागणी
राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना सध्या मिळणारी अडीच हजार रुपयांची रक्कम प्रतिमहिना सहा हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केली
दिव्यांग भवन तातडीने सुरू करण्याची मागणी
दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी दिव्यांग भवन तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली.




