अमोल खताळटॉप न्यूज़लोकल न्यूज़संगमनेरसामाजिक
Trending

पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ लोककला महोत्सवासाठी निधी मंजूर!

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील लोककलेची समृद्ध परंपरा जतन करण्यासाठी तसेच तमाशा कलावंतांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हिवरगाव पावसा येथील पहिल्या महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या लोककला महोत्सवासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आ. अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, लवकरच हिवरगाव पावसा येथे लोककला महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

संगमनेर परिसराला लोककलेची समृद्ध परंपरा लाभली आहे. तमाशा कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचे स्मरण व्हावे, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि नव्या पिढीला लोककलेची ओळख व्हावी, या उद्देशाने आमदार खताळ यांनी मागील वर्षापासून संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ तमाशा कलावंतांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मागील वर्षी संगमनेरच्या ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने वाई तालुक्यातील ज्येष्ठ तमाशा कलावंत आवळे मास्तर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

यंदा हा पुरस्कार हिवरगाव पावसा येथील स्व. पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या नावाने देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या स्मरणार्थ लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही आमदार खताळ यांनी हिवरगाव पावसा येथील कार्यक्रमात केली होती. या माध्यमातून लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्याबरोबरच या कलेचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या लोककला महोत्सवासाठी अंदाजे नऊ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार खताळ यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या नंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत लोककलेचे जतन, संवर्धन आणि ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान करण्यासाठी अशा महोत्सवांचे महत्त्व सांस्कृतिक विभागाच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून या महोत्सवासाठी निधीची तरतूद करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत यांनी महोत्सवाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देत सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हिवरगाव पावसा येथे लवकरच लोककला महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

संगमनेर तालुक्याला लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांचे स्मरण आणि सन्मान व्हावा, या उद्देशाने स्व. पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ लोककला महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठपुरावा केला होता. विभागाने सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येईल.— अमोल खताळ, आमदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!