पंडित नेहरूंनी आधुनिक भारत घडविला – मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
जवाहरलाल हाजीर हो पुस्तकाचे प्रकाशन,देशाचा इतिहास व विचारांचे मोठे भांडवल नव्या तंत्रज्ञानातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवा....!

संगमनेर ( प्रतिनिधी ) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीला नेतृत्व दिले. त्यांच्या नेतृत्वात पंडित जवाहरलाल नेहरू व सर्व राष्ट्रपुरुषांनी मोठा लढा दिला. आपल्या देशाला इतिहास व विचारांचे मोठे भांडवल असून नवीन तंत्रज्ञानाच्या द्वारे ऑडिओ, रिल्सच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे असे सांगताना 3259 दिवस देशासाठी तुरुंगवास भोगलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक घडविला असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी.दादा सभागृह येथे जयहिंद लोकचळवळ व प्रॉमिथीयस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहरलाल हाजीर हो या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे हे होते. तर व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, साहित्यिक व वक्ते संजय आवटे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.मैथिलीताई तांबे, अनुवादक डॉ.राहुल कोसंबी, प्रकाशक प्रमिला माया नारायण, कादंबरीकार श्रीरंजन आवटे, प्रा.हिरालाल पगडाल,प्रा.भगवान अहिरे,प्रा.बाबा खरात, रामहरी कातोरे, प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, अरुण ताजने, संदीप वाकचौरे,राजाभाऊ आवसक, डॉ.नामदेव गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने गांधी, नेहरू विचारांची चर्चा होणे ही आनंदाची बाब आहे. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला नेतृत्व दिले त्यांच्या नेतृत्वात पंडित जी स्वातंत्र्य चळवळीत आले. 3259 दिवस त्यांनी तुरुंगवासात घालवले. अहिल्या नगरच्या भुईकोट किल्ल्यात त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा अनमोल ग्रंथ लिहिला. पंडितजी हे गांधीजींच्या विचारातून घडले. आधुनिकता आणि तंत्रज्ञान यामधून त्यांनी देश घडविला.लालबहादूर शास्त्री हे अत्यंत तोला मोलाचे देशाचे

व्यक्तिमत्व होते. सोळाव्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या शास्त्रीजींनी 9 वर्ष तुरुंगात घालवले. गांधी, नेहरू विचारांची देशाला व जगाला गरज असून हा विचार आपण तरुण पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे आपल्याकडे भांडवल खूप आहे.समाजसुधारक, देशभक्त, राष्ट्रपुरुष संत महात्मे या सर्वांचे विचार आपल्याकडे आहेत. मात्र आपण बोलत नाही आणि त्यांच्याकडे काहीच नाही. मात्र नवीन तंत्रज्ञानातून ते विषारी प्रचार करत आहेत. आपला विचार शाश्वत आणि देशहिताचा असल्याने नवीन तंत्रज्ञान ऑडिओ व झेन झीसाठी रिल्स च्या माध्यमातून हा विचार तरुणांपुढे पोहोचवावा असे आवाहन त्यांनी केले.
तर संजय आवटे म्हणाले की, गांधी,नेहरू,आंबेडकर हे भारताला लाभलेले अनमोल रत्न आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. विरोधकांकडे कोणतेही भांडवल नाही ते सातत्याने नेहरूंवर टीका करत आहेत. नेहरू हे मोठे व्यक्तिमत्व होते. आधुनिकता त्यांच्याकडे होती. बोलण्यास स्पष्टता होती. नवा देश उभारण्याचे काम त्यांनी केले असून सध्याचे सत्ताधारी कोणतेही काम न करता सर्व दोष नेहरुंना देऊन मोकळे होतात. आयुष्यभर देशाची सेवा करणाऱ्या नेहरूनशिवाय भारत ही कल्पना शक्य नाही असे सांगताना आजही विरोधक दररोज नेहरू हाजीर हो म्हणत आहेत म्हणून नेहरूंचा विचार आपण समृद्धपणे पुढे नेला पाहिजे असे ते म्हणाले.
तर प्रा.रंगनाथ पठारे म्हणाले की, गांधी,नेहरू, आंबेडकर हे भारताकडे आहे.पाकिस्तानकडे नाहीत म्हणून त्यांची अवस्था वाईट आहे. ज्यांचा अभ्यास नाही असे मूर्ख लोक नेहरूंवर आरोप करत आहेत. भारताची फाळणी ही इंग्रजांची गरज होती. काश्मीर व इतर प्रश्नांबाबत त्यावेळीची परिस्थिती त्यानुसार निर्णय घेतले गेले. मोठी लोकप्रियता लाभलेले पंडित नेहरू हे परंपरेच्या अधिष्ठानावर उभे राहून आधुनिकतेचा विचार राबवणारे नेते होते. संगीत नाटक अकॅडमी, अनुषक्ती केंद्र, आयआयटी, विविध धरणे, इस्रो अशा संस्था उभ्या करणारे नेते ते होते असे ते म्हणाले.
तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, गांधी आणि नेहरूंच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे आणि हाच विचार शाश्वत आणि जगासाठी महत्त्वाचा आहे. आधुनिक भारत उभारणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे विज्ञानवादी नेते होते असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रकाशक प्रमिला माया नारायण, अनुवादक डॉ.राहुल कोसंबी यांची ही भाषणे झाली. यावेळी संगमनेर मधील साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ.तांबे हे गांधी नेहरूंचे विचार जपणारे नेते
राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत व समाज सुधारकांचा विचार जपणारे मा.मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आमदार डॉ.तांबे हे नेते आहेत. संकटाच्या काळातही ते आपल्या विचारांवर आणि तत्वांवर निष्ठा ठेवून भक्कमपणे उभे आहेत. निष्ठेचे आणि विचारांचे मोठे भांडवल हे नव्या पिढीसाठी आदर्श ठरणार असून संगमनेर हा पुरोगामी विचार जपणारा सुसंस्कृत तालुका व येथील नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे यांनी काढले.




