टॉप न्यूज़बाळासाहेब थोरातमहाराष्ट्रलोकल न्यूज़शरयू देशमुखशिक्षणसंगमनेर

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला दोन मानाचे राष्ट्रीय पुरस्कार

‘बेस्ट इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम’ आणि ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ पुरस्काराने गौरव....! शरयू देशमुख व्यवस्थापकीय विश्वस्त, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था

संगमनेर (प्रतिनिधी) : शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवकल्पना आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर दुहेरी यश संपादन केले आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), महाराष्ट्र व गोवा विभागाच्या वतीने सन २०२६ साठी महाविद्यालयाला ‘बेस्ट इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम’ आणि ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ हे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या सन्मानामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक कार्याचा गौरव झाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता संशोधनवृत्ती, आधुनिक तंत्रज्ञान, उद्योजकता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विकसित करण्यासाठी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. या प्रयत्नांची दखल या पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
नवकल्पना आणि स्टार्टअप उपक्रमांना प्रोत्साहन
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि स्टार्टअप क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘बेस्ट इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणे, त्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महाविद्यालय प्रयत्नशील आहे. या पुरस्कारासाठी प्रा. एस. एस. बाजगुडे यांनी विशेष योगदान दिले.
पर्यावरणपूरक उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल
महाविद्यालय परिसर हरित आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासह सौरऊर्जा प्रकल्प, वृक्षारोपण आणि शाश्वत विकासाशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ पुरस्काराने महाविद्यालयाला गौरविण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि दैनंदिन कामकाजात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यावर संस्थेचा भर आहे. या पुरस्कारासाठी डॉ. एस. बी. कोंडकर आणि प्रा. ज्योती मालुंजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅककडून ‘A+’ श्रेणी प्राप्त झाली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न या महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रगती केली आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने शिक्षणासोबतच संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाला महत्त्व दिले आहे.या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर, रजिस्ट्रार प्रा. व्हीu. पी. वाघ, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन  केले आहे. या पुरस्कारांमुळे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली असून, संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.

अमृतवाहिनीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव 
“सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आयएसटीईकडून ‘बेस्ट इनोव्हेशन अँड स्टार्टअप इकोसिस्टम’ आणि ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ हे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही अमृतवाहिनीसाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये नवकल्पना, उद्योजकता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे. या यशामागे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम आहेत. भविष्यातही अमृतवाहिनी महाविद्यालय राष्ट्रीय स्तरावर नवनवीन यश संपादन करून संस्थेचा लौकिक वाढवत राहील, असा विश्वास आहे.”
— शरयू देशमुख,व्यवस्थापकीय विश्वस्त, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!