‘ वोट बचाओ, देश बचाओ ’ अभियानासाठी मध्य प्रदेशात बाळासाहेब थोरात यांचा व्यापक दौरा
भोपाळ, रायसेन व विदिशा जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बैठका; अभियानाच्या तयारीचा घेतला आढावा १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या महारॅलीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना सूचना

भोपाळ, दि. २५ ऑक्टोबर २०२६ : देशातील लोकशाही, संविधान आणि प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या देशव्यापी अभियानाच्या निमित्ताने काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ, रायसेन आणि विदिशा या तीन जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिट्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच आगामी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या महारॅलीच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करून कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यप्रदेशात AICC पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर थोरात सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून, स्थानिक काँग्रेस संघटनेला सक्रिय करून हे अभियान गावपातळीपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या समवेत आमदार देवेंद्र पटेल, आमदार रजनीश सिंह, माजी मंत्री राजकुमार पटेल, माजी आमदार देवेंद्र पटेल, माजी आमदार शैलेंद्र पटेल, भोपाळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण सक्सेना, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनोखी मानसिंग पटेल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज सकाळी भोपाळ येथील मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या कथित मतचोरीच्या मुद्द्याचा संदर्भ देत त्यांनी केंद्रातील भाजपा सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा तसेच SIR प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेनंतर थोरात यांनी भोपाळ शहर व भोपाळ ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत अभियानाची स्थानिक पातळीवरील तयारी, मतदार याद्यांची पडताळणी, कार्यकर्त्यांचा सहभाग, बूथ स्तरावरील संघटनात्मक यंत्रणा आणि आगामी जनजागृती कार्यक्रम यांसंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येक जिल्हा, ब्लॉक आणि बूथ स्तरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत जागरूक करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
भोपाळ येथील कार्यक्रमानंतर बाळासाहेब थोरात रायसेन जिल्ह्यात दाखल झाले. तेथे त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून अभियानाची भूमिका मांडली. त्यानंतर रायसेन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने नावे वगळली गेल्याच्या तक्रारींची माहिती संकलित करणे, पात्र मतदारांना त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आवश्यक मदत करणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या अभियानाचा उद्देश पोहोचविणे या बाबींवर त्यांनी भर दिला.
त्यानंतर विदिशा जिल्ह्याला भेट देत थोरात यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीतही ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसच्या जिल्हा, ब्लॉक आणि बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेवून अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.
दिल्लीतील महारॅलीच्या तयारीवर विशेष भर
आगामी १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या सहभागातून होणाऱ्या महारॅलीच्या तयारीचा आढावाही थोरात यांनी या दौऱ्यात घेतला. या महारॅलीच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील काँग्रेस संघटना आणि कार्यकर्त्यांचा सहभाग, संघटनात्मक समन्वय आणि आवश्यक पूर्वतयारी याबाबत त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
काँग्रेस पक्षाच्या देशव्यापी कार्यक्रमानुसार २५ नोव्हेंबरपर्यंत गावागावांत चौपाल, जनजागृती कार्यक्रम आणि मतदार संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिट्या, ब्लॉक काँग्रेस कमिट्या आणि बूथ लेव्हल एजंट यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे थोरात यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. मतदार कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येता कामा नये. ही लढाई केवळ काँग्रेस पक्षाची नसून देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे अभियान सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन थोरात यांनी केले.
उद्या राजगड आणि सिहोर जिल्ह्यांचा दौरा
दरम्यान, सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी बाळासाहेब थोरात राजगड आणि सिहोर या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेस कमिट्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्याद्वारे त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या पाचही जिल्ह्यांतील संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.





