पठारभागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही!
आमदार अमोल खताळ यांची ग्वाही; महालवाडीत नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण

संगमनेर/ प्रतिनिधी
पठारभागाचा विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा होता, त्या पद्धतीने तो झालेला नाही, याची मला जाणीव आहे. पठारभागाला संपूर्ण संगमनेर तालुका म्हणूनच पाहत असून, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या भागाला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. भविष्यात हा पठारभाग संगमनेर मतदारसंघाशी कसा जोडता येईल, यासाठीही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली
संगमनेर तालुक्याच्या पठार भागा तील महालवाडी जवळे बाळेश्वरची शेंडेवाडी आणि वरुडी पठार येथील ढोरवाडी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून सुमारे ५३ लाख रुपये खर्चून बसविलेल्या नवीन विद्युत रोहित्रांचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. यावेळी घारगाव येथील महावितरणच्या भाग दोनचे कनिष्ठ अभियंता संजय थोरात, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शैलेश फटांगरे,डॉ भरत जाधव लक्ष्मण मिंडे संतोष फटांगरे रंगनाथ कोठवळ संतोष मुंडे सौ शांता घोडे सावळेराम कोठवळ भीमाशंकर कोठवळ एकनाथ कोठवळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, पठारभागात येऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या सोडविणे गरजेचे आहे. जनहितासाठी मी ठरलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन काम करणारा आमदार आहे. पठारभागातील नागरिकांनी मला मोठे सहकार्य केले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून बोटा गटालाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतरही काही भागांना पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकला नसेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
माझ्याकडे अद्याप ८० कामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम बाकी आहेत. तरीही ग्रामस्थांच्या प्रेमाखातर आज येथे आलो आहे. एखाद्या कामाचे उद्घाटन करताना माझ्याकडे पाच नव्हे, तर २५ नारळ असतात. शेवटी मी नारळ फोडतो; कारण प्रत्येकाला त्याचा योग्य मान-सन्मान मिळाला पाहिजे, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे, दुष्काळामुळे पाणी आणि वीज या समस्या गंभीर बनत आहेत. मात्र, या संकटावरही मात करून आपण पुढे जाऊ. रोजगार हमीची कामे नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी लवकरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. महालवाडीत मी पहिल्यांदाच आलो असून, पठारभागातील नागरिकांची आपल्या गावात यावे, अशी नेहमीच आग्रही मागणी असते
नागरिकांचे जातीचे दाखले, रेशनकार्ड यांसारखी कामे असतील, तर तीही मार्गी लावली जातील. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्यांचा जपून वापर करणे आवश्यक आहे. सध्या निवडणूक नसतानाही काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जमाफीपासून वंचित ठेवले असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासनही आमदार अमोल खताळ यांनी दिलमहालवाडीत आमदार खताळांचे जंगी स्वागत!
महालवाडीत आमदार खताळांचे जंगी स्वागत!
महालवाडीत आमदार अमोल खताळ पहिल्यांदाच दाखल होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत, वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांची उधळणही केली. स्वागतासाठी ग्रामस्थांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. ‘आमदार कसा असावा, हे अमोल खताळ यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,’ अशा शब्दांत ग्रामस्थ आपली भावना व्यक्त करत होते. ग्रामस्थांच्या या उत्स्फूर्त स्वागताने महालवाडीतील कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
संगमनेर तालुक्यातील जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून या योजनेच्या सद्यस्थितीला होत असणाऱ्या कामांवर नाराजी व्यक्त करून ठेकेदार व संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. या योजनेमुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी कामे अपूर्ण राहिली त्यामुळे या योजनेची बदनामी झाली आहे, या योजनेच्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी आपण हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळात करून या योजनेवर आवाज उठवणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले





