धर्म-संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांचीच

संगमनेर, प्रतिनिधी
धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला एकत्र ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संत-महंतांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी मोठे कार्य केले. संत-महंतांनी दिलेला हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, मालुंजे जाखुरी, देवगाव आणि रायतेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहांना आमदार खताळ यांनी भेटी दिल्या. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले,
श्रीकृष्णाच्या जन्माची ज्या पद्धतीने आपण मध्यरात्री आतुरतेने प्रतीक्षा करतो, त्याचप्रमाणे संत-महंतांच्या मार्गदर्शनातून परमार्थाचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे. मानवाची सेवा करणे, माणसा-माणसामध्ये परमेश्वर शोधणे आणि विठ्ठलाची भक्ती करणे हीच आपल्या संस्कृतीची आणि संतपरंपरेची शिकवण आहे

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह असंख्य संतांनी महाराष्ट्राला समृद्ध आध्यात्मिक वारसा दिला आहे. हा वारसा केवळ जपणे नव्हे, तर तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावांत धर्म आणि अध्यात्माची जागृती होत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण या सप्ताहाची आतुरतेने वाट पाहतो. अशा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे गावातील वातावरण भक्तिमय व पवित्र होते आणि समाजातील एकोपा अधिक दृढ होतो.
ग्रामीण भागातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कृषी फिडरचे विभक्तीकरण करून सिंगल फेज जोडणीच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेर खुर्द येथे या कामाची सुरुवात झाली असून, आगामी काळात ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. तसेच तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा आणि ग्रामीण भागातील तरुण उद्योजक व्हावेत, यासाठी कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहत उभारण्याचे काम पुढे नेले जात आहे. महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संगमनेर तालुक्यात १०० खाटांचे रुग्णालयाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आमदार खताळ यांनी यावेळी सांगितले.
जाखुरीच्या सभामंडपासाठी २० लाखांचा निधी
जाखुरी येथील सभामंडपाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० लाख रुपयेn आणि त्यानंतर आणखी १० लाख रुपये, असा एकूण २० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली. पुढील वर्षीच्या हरिनाम सप्ताहापर्यंत सभामंडपाचे काम पूर्ण झालेलेअसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रायतेवाडी येथील सभामंडपासाठी आमदार निधीतून १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच मालुंजे चिंचोली गुरव जाखुरी देवगाव रायतेवाडी सह तालुक्यातील विविध गावांच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.




