‘पहिलवान आला रे…’वर खताळांनी दंड थोपटले!
तरुणांनी खांद्यावर घेतले; थोरात-तांबेंना राजकीय इशाराच दिल्याची चर्चा रंगली.

संगमनेर/प्रतिनिधी
“बोल बजरंगबली की जय… जय सियाराम… छत्रपती शिवाजी महाराज की जय…” अशा घोषणांनी संगमनेर बसस्थानक परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांची थरारक कसरत आणि तरुणाईचा उत्स्फूर्त जल्लोष यामुळे गोकुळाष्टमीच्या दहीहंडी उत्सवाला चांगलाच रंग चढला. यावेळी ‘पहिलवान आला रे पहिलवान आला…’ आणि ‘मै हूँ डॉन’ या गाण्यांवर तरुणांनी आमदार अमोल खताळ यांना खांद्यावर उचलून घेत नाचविले. आमदार खताळ यांनीही दोन-तीन वेळा दंड थोपटत तरुणाईच्या उत्साहाला दाद दिली. या जल्लोषातून आणि दंड थोपटत आमदार खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांना जणू काही राजकीय इशाराच दिल्याची चर्चा रंगली.
येथील बसस्थानक परिसरात गोकुळाष्टमीचे औचित्य साधून आमदार अमोल खताळ पाटील युवा मंचाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि विशेषतः तरुण उपस्थित होते. ढोल-ताशांच्या निनादात गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांनी उपस्थितांची उत्सुकता वाढविली. उत्सवस्थळी आमदार अमोल खताळ यांचे आगमन होताच तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. काही क्षणांतच तरुणांनी खताळ यांना खांद्यावर उचलून घेतले. त्यानंतर ‘पहिलवान आला रे पहिलवान आला’ या गाण्याचा आवाज घुमला आणि तरुणाईने एकच जल्लोष केला. त्यापाठोपाठ ‘मै हूँ डॉन’ या गाण्यावरही उत्साहाला उधाण आले. आमदार खताळ यांनी दंड थोपटत या जल्लोषात सहभाग घेतल्याने उपस्थितांचा उत्साह आणखी वाढला.

संगमनेरच्या राजकारणात आमदार अमोल खताळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यातील राजकीय संघर्ष सातत्याने चर्चेत असतो. या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवात तरुणांनी आमदार खताळ यांना खांद्यावर घेत केलेले शक्तिप्रदर्शन आणि ‘पहिलवान’ व ‘डॉन’च्या गाण्यांवर झालेला जल्लोष एक वेगळाच संदेश देऊन गेला तरुणांची मोठी उपस्थिती आणि आमदार खताळ यांच्याभोवती दिसलेला उत्साह चर्चेचा विषय ठरला टाळ्यांचा कडकडाट, ढोल-ताशांचा निनाद, घोषणाबाजी आणि गोविंदा पथकांच्या कसरतींनी संपूर्ण बसस्थानक परिसर उत्साहाने भारून गेला होता. मात्र, या सर्वांमध्ये खताळांना तरुणांनी खांद्यावर घेतलेला क्षण आणि त्यांनी दंड थोपटत दिलेली दाद हा दहीहंडी उत्सवाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला.




