Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
अकोलेटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

रोटरी क्लब संगमनेरच्या अध्यक्षपदी समीर शाह; सचिवपदी संकेत काजळे

खजिनदारपदी मोहित मंडलिक यांची निवड; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

संगमनेर: (सुदिन न्यूज नेटवर्क)

सामाजिक बांधिलकी जपत सेवा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या ४3 व्या पदग्रहण समारंभात नूतन पदाधिकाऱ्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी समीर सुभाष शाह यांची अध्यक्षपदी, संकेत राजेंद्र काजळे यांची सचिवपदी तर मोहित नामदेव मंडलिक यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे झालेल्या या कार्यक्रमाला रोटरी पदाधिकारी, सदस्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांची उपस्थिती होती. रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल (DG) जयेशभाई पटेल, सहाय्यक प्रांतपाल (AG) भगवंत काटे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मागील वर्षाचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी आणि सचिव समीर म्हाळस यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी नूतन अध्यक्ष समीर शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला प्राधान्य
रोटरी क्लबच्या आगामी वर्षातील विविध सेवा उपक्रमांची माहिती देताना नूतन अध्यक्ष समीर शाह यांनी शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त केला. आर्थिकदृष्ट्या किंवा सुविधांच्या दृष्टीने मागे असलेल्या शाळांमध्ये डिजिटल बोर्ड, ग्रीन बोर्ड, हॅन्डवॉश स्टेशन, विद्यार्थ्यांसाठी शूज तसेच ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यासारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय रोटरी आय केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध सेवा प्रकल्प राबविण्यावरही भर देण्यात येणार आहे. शहरातील गरजू नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
रोटरीची सेवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत रोटरीची सेवा पोहोचविण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन करण्यात आले. उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना रोटरीच्या सेवाकार्यात सहभागी करून घेण्यावरही भर देण्यात आला.
आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मनोगतात रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच शहरातील एखादा महत्त्वाचा नागरी प्रश्न रोटरीच्या माध्यमातून हाती घेऊन तो पूर्णत्वास नेण्याची सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमादरम्यान रोटरी क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विविध सेवा उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सदस्यांचा गौरव करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीने आगामी वर्षात सेवा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांमध्ये प्रभावी काम उभे करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!