चिठ्ठी’ची गरज नाही… थेट आमदारांना भेटा; जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न जागीच मार्गी
दवाखान्याच्या बिलापासून रोहित्र, रस्ते, रेशनकार्ड, शेतीच्या प्रश्नांपर्यंत तत्काळ पाठपुरावा

संगमनेर | सुदिन न्यूज नेटवर्क
“भाऊ, दवाखान्याचे बिल जास्त झाले आहे, थोडे कमी करून द्या…”, “भाऊ, आमच्या गावचे रोहित्र जळाले आहे…”, “रस्त्याचे काम रखडले आहे…”, “रेशनकार्डाचे काम अडकले आहे…” अशा विविध समस्या घेऊन दररोज नागरिक थेट आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचत आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारची शिफारस, ओळख किंवा चिठ्ठी न लागता नागरिकांना आमदारांची थेट भेट मिळत असून, अनेक प्रश्नांवर ते संबंधित अधिकाऱ्यांशी जागेवरच संपर्क साधून तत्काळ पाठपुरावा करतात. त्यामुळे “कामाचा दमदार माणूस” अशी आमदार खताळ यांची वेगळी ओळख मतदारसंघात निर्माण झाली आहे.

जनसंपर्क कार्यालय ठरते नागरिकांसाठी आशेचे केंद्र
आमदार झाल्यानंतर अमोल खताळ यांनी सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय आज मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आशेचे केंद्र ठरत आहे. संगमनेर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर इतर भागांतूनही नागरिक विविध अडचणी घेऊन येथे येत आहेत. रेशनकार्ड, रस्ते, वीजपुरवठा, जळालेले रोहित्र, शासकीय योजनांचा लाभ, महसुली प्रश्न, शेतीविषयक अडचणी अशा विविध विषयांवर नागरिक कार्यालयात आपली व्यथा मांडतात.
‘चिठ्ठी आणा’ नव्हे, थेट भेटीवर भर
अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी ओळखीची चिठ्ठी किंवा शिफारस आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये असते. मात्र, आमदार अमोल खताळ यांनी ही पद्धत पूर्णपणे बाजूला ठेवली आहे. “कोणाची चिठ्ठी आणा” किंवा “फलाण्याची ओळख आहे का?” असे प्रश्न विचारले जात नसल्याने सर्वसामान्य नागरिक कोणत्याही संकोचाशिवाय थेट त्यांची भेट घेतात. प्रत्येकाची समस्या शांतपणे ऐकून संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधण्यावर त्यांचा भर असतो.
प्रश्न ऐकून तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना
जनसंपर्क कार्यालयात आलेल्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतल्यानंतर आमदार खताळ अनेकदा संबंधित अधिकारी, विभागप्रमुख किंवा कर्मचाऱ्यांशी तत्काळ दूरध्वनीवर संपर्क साधतात. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये जागेवरच निर्णयाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे नागरिकांनाही आपल्या प्रश्नावर त्वरित कार्यवाही होत असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.
कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे आपुलकीने स्वागत
जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे आपुलकीने स्वागत केले जाते. नागरिकांना चहापाण्याची व्यवस्था करून त्यानंतर त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या जातात. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला लोकप्रतिनिधी सहज उपलब्ध असल्याची भावना निर्माण होत असून, याच कारणामुळे कार्यालयात दररोज नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही तितकीच संवेदनशीलता
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यावरही आमदार खताळ विशेष भर देत असल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, वीज, पाणी, सिंचन, कृषीविषयक अडचणी यासंदर्भातील प्रश्नांवर ते सातत्याने पाठपुरावा करतात. काही दिवसांपूर्वी मध्यरात्री बारा वाजता नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या डाळिंब बागेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दवाखान्याच्या बिलासाठीही नागरिकांचा विश्वास
फक्त शासकीय कामेच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमधील उपचारांबाबतही अनेक नागरिक आमदार खताळ यांच्याकडे मदतीसाठी येतात. “भाऊ, नातेवाईक दवाखान्यात उपचार घेत आहेत. डॉक्टरांना थोडे बिल कमी करण्यास सांगा,” अशी विनंतीही अनेक कुटुंबीय करत असल्याचे चित्र जनसंपर्क कार्यालयात पाहायला मिळते. नागरिकांचा हा विश्वासच त्यांच्या जनसंपर्काची ताकद मानला जात आहे.
लहान मुलांमध्येही निर्माण झाली वेगळी ओळख
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लहान मुलांमध्येही आमदार अमोल खताळ यांच्याबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. विविध कार्यक्रम, शाळा, सामाजिक उपक्रम आणि जनसंपर्क दौऱ्यांमुळे मुलांशीही त्यांचा थेट संवाद होत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे कार्यकर्ते आणि नागरिक सांगतात.

लोकसंपर्कातून निर्माण झालेला विश्वास
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा स्वतःचा प्रश्न समजून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची भूमिका आमदार अमोल खताळ सातत्याने मांडत असतात. त्यामुळे “आमदारांना भेटलो की कामाला गती मिळते,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. सर्वसामान्यांसाठी सदैव खुले असलेले जनसंपर्क कार्यालय आणि तत्पर पाठपुरावा यामुळे आमदार खताळ यांची लोकाभिमुख प्रतिमा अधिक बळकट होत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.




