
संगमनेर (प्रतिनिधी) : यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे बैलांचे पारंपरिक महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मात्र, शेती आणि शेतकरी यांच्या जीवनाशी बैलांचे नाते अतूट आहे. कितीही यांत्रिकीकरण झाले, तरी बैलांशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे बैलपोळा आणि ट्रॅक्टर पोळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास नीलम खताळ यांनी भेट देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैलांचे तसेच ट्रॅक्टरचे पूजन केले यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
सौ खताळ म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी शेतीच्या मशागतीचे बहुतांश कामे बैलांच्या मदतीने केली जात होती.बैल हा केवळ शेतीचा
साथीदार नसून शेतकऱ्याच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा सदस्य मानला जातो आहे काळ बदलला,शेतीत यांत्रिकीकरण आले व ट्रॅक्टरसह विविध आधुनिक यंत्रांचा वापर वाढला. त्यामुळे शेतीची कामे जलद सोपी झाली असली, तरी बैलांप्रती असलेली शेतकऱ्यांची कृतज्ञता आणि भावनिक नाते आज ही कायम आहे.बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि त्याच्या पशुधनातील जिव्हाळ्याचे नाते जपणारा सण आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. त्याच बरोबर आजच्या काळात ट्रॅक्टरनेही शेतीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली असून, ट्रॅक्टर पोळ्याच्या माध्यमातून आधुनिक शेतीच्या साधनांविषयीही कृतज्ञता व्यक्त केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलांना आकर्षक सजावट करून त्यांचे पूजन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करतानाच ट्रॅक्टरचेही पूजन करण्यात आल्याने कार्यक्रमाला पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.




