पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन हीच काळाची गरज आ. खताळ;
आढळा नदीचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते जलपूजन


संगमनेर | सुदिन न्यूज नेटवर्क
आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, त्याचा थेट लाभ शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच भूजल पातळी वाढण्यासाठी होणार आहे. या उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथे आढळा नदीच्या पाण्याचे जल पूजन आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभाग अभियंता योगेश जोर्वेकर प्रीतम शेवाळे महायुतीचे यावेळी दत्ता कडलग, वैभव नाईकवाडी, सुरेश लांडगे, हरीश चकोर, संदेश देशमुख, सुशांत कडलग, बापूसाहेब देशमुख, भाऊसाहेब साळवे, राजेंद्र देशमुख, अशोक देशमुख, बापू देशमुख, रोहिदास साबळे, संजय कडलग, कैलास आडभाई, मीनानाथ खताळ, रामा जमदाडे, विनोद सुर्वे, श्रीकांत कडलग, पोपट नाईकवाडी, शरद कदम, रोहिदास कडलग, मनोज देशमुख, अरुण देशमुख, दिलीप देशमुख रोहिदास गुंजाळ आशिष कानवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, यापूर्वी धरणातील पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन होत नव्हते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अपेक्षित लाभ शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मिळत नव्हता. मात्र यंदा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढळा, भोजापूर आणि निळवंडे धरणांच्या पाण्याचे जलसंपदा विभागाने प्रभावी नियोजन केले. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर शक्य झाला आहे.
याच नियोजनामुळे गत उन्हाळ्यात निळवंडे, आढळा आणि भोजापूर धरणांमधून कालव्याद्वारे तब्बल आठ आवर्तने सोडण्यात आली. दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला. भविष्यातही उपलब्ध जलसंपत्तीचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणे ही काळाची गरज असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.आढळा धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका आणि जलस्रोतांची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीला आवश्यक ओलावा टिकून राहण्यास, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुधारण्यास आणि भूजल पुनर्भरणास मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर्षी हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र निसर्गाने साथ दिल्याने तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. परिणामी आढळा आणि भोजापूर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. आढळा धरणातून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने आढळा नदी दुथडी भरून वाहत आहे. या पाण्याचे योग्य नियोजन आणि काटकसरीने व्यवस्थापन केल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळी यासाठी वर्षभर मोठा लाभ मिळू शकतो.




