शाळांच्या वर्गखोल्यांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर
आमदार अमोल खताळ; कसारा दुमाला, तळेगाव दिघे व मिर्झापूरच्या शाळांचा समावेश

संगमनेर/प्रतिनिधी
समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील कसारा दुमाला येथील सावंतवस्ती, तळेगाव दिघे येथील धनगरवाडी आणि मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.आमदार खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने अध्यापनावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन संबंधित शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कसारा दुमाला (सावंतवस्ती), तळेगाव दिघे (धनगरवाडी) आणि मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मंजूर झालेल्या या निधीमुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रशस्त, सुरक्षित व शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नवीन वर्गखोल्यांमुळे नियमित अध्यापनासाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार असून, शिक्षकांनाही अध्यापनाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शाळांच्या इमारती, वर्गखोल्या तसेच अन्य मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. समग्र शिक्षा योजनेंतर्गत मिळालेल्या या निधीमुळे संबंधित गावांतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.





