अमोल खताळटॉप न्यूज़लोकल न्यूज़संगमनेर

ज्ञानमाता शाळा ते तीन बत्ती चौक मार्गावरील अतिक्रमणे हटवा

युवा सेनेची मुख्याधिकाऱ्यांकडे व पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेर शहरातील कोल्हार-घोटी मार्गावर ज्ञानमाता शाळा ते तीन बत्ती चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकवरही दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सिगारेट, गुटखा, तंबाखू तसेच नशायुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याची मागणी युवासेना पदाधिकाऱ्यांनी पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

कोल्हार-घोटी मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वाहने व नागरिकांची ये-जा सुरू असते. ज्ञानमाता शाळा ते तीन बत्ती चौक या परिसरात रस्त्यालगत विविध दुकाने आहेत. मात्र, काही दुकानदारांनी दुकानासमोरील पादचारी मार्गावर अतिक्रमण केले आहे त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी, पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असून वाहनचालक आणि नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्ते आणि पादचारी मार्ग नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ वाहतुकीसाठी असताना त्यावर अतिक्रमणे होणे ही गंभीर बाब आहे.

संबंधित मार्गाची प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्त्यालगतची सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत. पादचाऱ्यांसाठी असलेले पेव्हिंग ब्लॉक मोकळे करून नागरिकांना सुरक्षितपणे चालता येईल, अशी व्यवस्था करावी. तसेच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख तालुकाप्रमुख सुशील शेवाळे शहर प्रमुख सार्थक शेवाळे यांनी केली.

अतिक्रमणांच्या प्रश्नाबरोबरच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सिगारेट, गुटखा, तंबाखू व नशायुक्त पदार्थांची विक्री होत आहे. विद्यार्थ्यांच्या आस पास अशा नशायुक्त पदार्थांची उपलब्धता होणे चिंताजनक असून, त्याचा शालेय व महाविद्यालयीन युवकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर पोलीस प्रशासनाने परिसरातील पानटपऱ्या आणि संशयित विक्री केंद्रांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!