Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़देशलोकल न्यूज़

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा; स्वातंत्र्य सैनिक कल्याण समितीसाठी कारखान्याची ४२ गुंठे जागा, संगमनेरमध्ये साकारणार राज्यातील सर्वात देखणे स्वातंत्र्य सैनिक स्मारक

संगमनेरमध्ये राज्यातील सर्वात देखणे स्वातंत्र्य सैनिक स्मारक उभारण्यात येणार,

 

संगमनेर | सुदिन न्यूज नेटवर्क

देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचे शौर्य, त्याग आणि देशभक्तीची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने संगमनेरमध्ये राज्यातील सर्वात देखणे स्वातंत्र्य सैनिक स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेल्हाळे परिसरातील ४२ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली.संगमनेर येथे स्वातंत्र्य सैनिक कल्याण समिती वतीने कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रामहरी कातोरे, मेजर भाऊसाहेब पोखरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर, कॅप्टन सुभाष कुडेकर, सुनील थोरात, प्रा. बाबा खरात, किसनभाऊ हासे, जितेश लोढा, युवराज गांजवे, रोहिणी कोटकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक कल्याण समितीचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात म्हणाले की, व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कल्याण समिती सातत्याने प्रयत्नशील होती. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून तसेच स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी अद्वितीय शौर्य, धैर्य आणि त्यागाची परंपरा कायम राखली आहे. सीमेवर दिवस-रात्र सज्ज राहणाऱ्या जवानांमुळेच देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित जीवन जगत आहे.

ते पुढे म्हणाले की, कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याने उंच डोंगररांगांवर ताबा मिळवला होता. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि खालून वरच्या दिशेने लढाई लढण्याचे मोठे आव्हान असूनही भारतीय जवानांनी आपल्या अदम्य शौर्याच्या बळावर विजय मिळवला. कारगिलमधील हा विजय भारतीय इतिहासातील सुवर्ण अध्याय असून तो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापासून ते स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान आणि चीनविरुद्ध झालेल्या युद्धांपर्यंत भारतीय सैन्याने वेळोवेळी आपल्या पराक्रमाची छाप जगासमोर उमटवली आहे. अशा शूरवीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात येणारे हे स्मारक भावी पिढ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच वीरमाता आणि वीरपत्नींच्या सन्मानासाठी स्वातंत्र्य सैनिक कल्याण समिती करत असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित राखण्यात भारतीय सैनिकांचे योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे समाजाने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने स्मारकासाठी ४२ गुंठे जागा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

यावेळी भानुदास पोखरकर, प्रा. बाबा खरात आणि कॅप्टन सुभाष कुडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.  कारगिल विजय दिनानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालपाणी लॉन्स दरम्यान भव्य रॅली काढली. ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कोटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनील थोरात यांनी मानले. या कार्यक्रमास तालुक्यातील सैनिक कुटुंबीय, महिला, नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीरमाता, वीरपत्नी आणि समाजभूषण हरिभाऊ उगले यांचा गौरव

या सोहळ्यात संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मानपत्र आणि ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

तसेच देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांच्या वीरपत्नी श्रीमती वैशाली बडे, श्रीमती वर्षा घोडेकर, श्रीमती सुरेखा पवार, श्रीमती मनीषा गुंजाळ, श्रीमती मंगल वलटे, श्रीमती सिंधुताई मनसुख तसेच वीरमाता लहानुबाई ढगे यांचा सन्मानचिन्ह देऊन भावपूर्ण वातावरणात गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!