संगमनेरमध्ये अद्यावत पोलीस स्टेशन व कर्मचारी निवासस्थानाच्या उभारणीला गती
आमदार अमोल खताळ यांनी घेतला कामाचा आढावा

संगमनेर: (सुदिन न्यूज नेटवर्क) संगमनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत पोलीस स्टेशन व कर्मचारी निवासस्थान प्रकल्पाचा आमदार अमोल खताळ यांनी आढावा घेतला.
गृहनिर्माण विभागांतर्गत या प्रकल्पाशी संबंधित विविध कामांसाठी मे. श्री. जाजू असोसिएट्स, संगमनेर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सल्लागारांकडून प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेत, कामाची गुणवत्ता, गती आणि नियोजन याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची सद्यस्थिती, नियोजन आणि आवश्यक बाबींवर आमदार अमोल खताळ यांनी संबंधितांशी सविस्तर चर्चा केली.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे संगमनेरच्या सुरक्षा व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे.संगमनेर शहरासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे तीन मजली पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) कार्यालय संगमनेर बस स्थानकाच्या मागील बाजूस जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेत उभारण्यात येत आहे. यासोबतच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थानांची उभारणीही याठिकाणी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी 1000 चौरस फूट क्षेत्रफळाचे 24 फ्लॅट आणि 840 चौरस फूट क्षेत्रफळाचे 24 फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांसाठी 1450 चौरस फूट क्षेत्रफळाचे 11 फ्लॅट उभारले जाणार आहेत. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसाठी 2200 चौरस फूट क्षेत्रफळाचा प्रशस्त बंगला देखील या प्रकल्पात समाविष्ट आहे.याशिवाय संपूर्ण परिसरात अंतर्गत डांबरी रस्ते, भव्य पार्किंग सुविधा तसेच संरक्षक भिंतीची उभारणी करण्यात येणार असल्याने हा परिसर आधुनिक आणि सुरक्षित स्वरूपात विकसित होणार आहे.विशेष म्हणजे, हा प्रकल्प यापूर्वी रखडलेला होता. मात्र आमदार अमोल खताळ यांनी या विषयात पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान त्यांनी हा विषय प्रभावीपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या पुढाकारामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार असून संगमनेरच्या पोलीस यंत्रणेला आधुनिक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “संगमनेर शहराची वाढती लोकसंख्या आणि सुरक्षा व्यवस्थेच्या गरजा लक्षात घेता अत्याधुनिक पोलीस स्टेशन व निवासस्थानांची आवश्यकता होती. हा विषय मी सातत्याने विधानमंडळात मांडला आणि शासन स्तरावर पाठपुरावा केला. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल. संगमनेरच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रकल्पासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील.
या महत्त्वपूर्ण आणि रखडलेल्या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेला गती देऊन संगमनेरच्या पोलीस यंत्रणेला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब तसेच शिवसेना-भाजप महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.




