पुणे – नाशिक सरळ रेल्वे झालीच पाहिजे; जनमताचा रेटा वाढला

संगमनेर : (सुदिन न्यूज नेटवर्क) नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीला आता अधिक वेग आला असून, या बहुप्रतीक्षित प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींकडूनही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासनाने पुणे-नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून, या निर्णयाचे आमदार सत्यजित तांबे यांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पातील अडचणी दूर करून कामाला गती देण्याची मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे-नाशिक सरळ रेल्वेच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे.
ही समिती रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित रेखांकनाचा तसेच त्यासंदर्भातील संभाव्य परिणामांचा अभ्यास करून राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून या प्रकल्पाचा वस्तुनिष्ठ अभ्यास होऊन सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावित रेखांकनामुळे खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलि

स्कोप (GMRT) संदर्भात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला होत असलेल्या विलंबाकडे आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचीही उपस्थिती होती. प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्या
च्या विकासाला मिळणारी चालना तसेच नागरिकांच्या अपेक्षा याबाबत बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका व्यक्त केली. त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
यापूर्वी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी मंजुरी मिळून भूमिपूजनही झालेले आहे. तसेच प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नाशिक-पुणे सरळ रेल्वे हाच योग्य पर्याय असल्याचे या मागणीचे समर्थन करणाऱ्यांचे म्हणणे आहे. हा रेल्वे मार्ग नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून उद्योग, शिक्षण, रोजगार, शेती आणि व्यापाराच्या दृष्टीनेही त्याचे मोठे महत्त्व आहे.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, रेल्वेची मागणी ही केवळ एका रेल्वे मार्गापुरती मर्यादित नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाशी निगडित आहे. सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, ओझरगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुण्याला जोडणारा सरळ रेल्वे मार्ग उद्योग, शिक्षण, रोजगार, शेती आणि व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांती दिनानिमित्त सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर होणारे चक्काजाम जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी नागरिकांच्या सहभागातून आंदोलनाची धारही वाढत आहे. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चक्का जाम आंदोलन नियोजितप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वेचा प्रश्न सुटावा यासाठी विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक, विविध संस्था आणि नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक-पुणे सरळ रेल्वेचा प्रश्न केवळ एका रेल्वे मार्गापुरता मर्यादित नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाशी निगडित असल्याने, तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि केंद्र शासनाची पुढील भूमिका याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




