Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
Uncategorizedटॉप न्यूज़युवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़संगमनेर

आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगले संगमनेर

भव्य मिरवणुकीत आमदार अमोल खताळ सहभागी

संगमनेर:(सुदिन न्यूज नेटवर्क)

जागतिक आदिवासी दिनानिमित्त संगमनेर शहरात आदिवासी बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आदिवासी बांधवां समवेत आमदार अमोल खताळ यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पारंपरिक वाद्यांचा गजर, आदिवासी नृत्य आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांमुळे शहरातील वातावरण आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगून गेले होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बसस्थानक मार्गे नवीन अकोले रोड, बायपास, अकोले रोडमार्गे मिरवणूक मातोश्री लॉन्स येथे पोहोचली. तेथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

मिरवणुकीदरम्यान आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती, कला आणि लोकजीवनाचे दर्शन घडले. पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या तालावर तरुणाईसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मिरवणुकीत सहभागी होऊन आदिवासी बांधव-भगिनींसोबत जागतिक आदिवासी दिनाचा आनंद आणि अभिमान साजरा करण्यात आला.

यावेळी आदिवासी समाजाने जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतीवीरांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेलाही उजाळा देण्यात आला. ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष करताना अनेक आदिवासी क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानामुळे स्वातंत्र्यलढ्याला मोठे बळ मिळाले. अशा तमाम आदिवासी क्रांतीवीरांना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिक्षण, रोजगार, आरोग्य, मूलभूत सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, मूलभूत सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आदिवासी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण करत त्यांच्या विकासाला अधिक गती देणे हीच क्रांतीवीरांना खरी आदरांजली ठरेल.

— अमोल खताळ, आमदार
…………………………………….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!