गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करा
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

संगमनेर/ प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील विविध समस्या तातडीने मार्गी लावून गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात. गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या घेण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी संगमनेर नगरपालिकेने तातडीने ‘एक खिडकी योजना’ सुरू करावी. तसेच शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात सोमवारी (दि.३१) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशोत्सवाच्या नियोजनासह शहरातील वाहतूक, रस्ते, वीजपुरवठा, कायदा व सुव्यवस्था तसेच गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
परवानग्यांसाठी एकाच ठिकाणी सुविधा
यावेळी आमदार खताळ म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना वेगवेगळ्या विभागांकडून परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांना विविध कार्यालयांमध्ये जावे लागून त्यांची मोठी गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी संगमनेर नगरपालिकेने ‘एक खिडकी योजना’ सुरू करावी. या माध्यमातून गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने शहरातील तसेच उपनगरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
शहरासह उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात फिरत असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. गणेशोत्सव काळात वाहतूक वाढणार असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
लोंबकळणाऱ्या तारांची पाहणी करा
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांत गणेश मंडळांकडून देखावे, कमानी आणि विद्युत रोषणाई करण्यात येते. अशा परिस्थितीत रस्त्यांवरील तसेच वस्त्यांमधील लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे महावितरणने अशा ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी. गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी विशेष दक्षता घ्यावी.
संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवा
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहर व ग्रामीण भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या. या बैठकीस या बैठकीस संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, महावितरण चे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे उपअभियंता नामदेव शेळके मुख्याधिकारी दयानंद गोरे,गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, शहरपोलीस निरीक्षक समीर बारवकर, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते




