Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
अकोलेटॉप न्यूज़दुनियादेशमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर ‘चक्काजाम’; आमदार सत्यजीत तांबे यांची जनआंदोलनाची हाक

चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक या प्रमुख ठिकाणी एकाच वेळी आंदोलन

संगमनेर : (सुदिन न्यूज नेटवर्क)  नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीने आता निर्णायक टप्पा गाठला असून, या प्रकल्पाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या व्यापक जनआंदोलनाची घोषणा केली आहे.

चाकण, राज गुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक या प्रमुख ठिकाणी एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून, लाखो नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित विषय आहे, अशी भूमिका आमदार तांबे यांनी मांडली.

एका बाजूला केंद्रीय पातळीवरून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे या मार्गाची गरज आणि जनतेच्या अपेक्षा कायम आहेत. त्यामुळे केवळ नफा-तोट्याच्या निकषांवर निर्णय न घेता, या भागातील लाखो नागरिकांच्या भविष्यासाठी सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोठे रेल्वे प्रकल्प वारंवार उभे राहत नाहीत. आज ही संधी गमावली तर पुढील अनेक पिढ्यांना या महत्त्वाच्या वाहतूक सुविधेपासून वंचित राहावे लागू शकते, असेही तांबे यांनी स्पष्ट केले.

प्रवासाचा वाढता त्रास; रेल्वेची गरज तीव्र

नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा रस्ते प्रवास सध्या वाहतूक कोंडी, रस्त्यांची स्थिती आणि वाढत्या अपघातांमुळे अधिक त्रासदायक झाला आहे. अनेक वेळा या प्रवासासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागत असल्याचे चित्र आहे.

या मार्गावर विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नियमित ये-जा असते. त्यामुळे नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच या भागातील वाहतुकीवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर आणि चाकणसह संपूर्ण परिसराच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला या रेल्वे मार्गामुळे मोठी चालना मिळू शकते, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडण्यात आली आहे.

९ ऑगस्टला विविध ठिकाणी एकाच वेळी आंदोलन

आमदार सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक येथे एकाच वेळी चक्काजाम करण्यात येणार आहे.

हे आंदोलन केवळ वर्तमानातील मागणीसाठी नसून भावी पिढ्यांच्या विकासासाठीचा लढा असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. जनतेची एकजूट सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी निर्णायक ठरू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वीही सातत्याने पाठपुरावा

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी यापूर्वीही विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या मार्गासंदर्भातील विविध मंजुऱ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, अनेक शेतकऱ्यांना सुमारे ६५० कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच महामार्गालगतच्या भागातील लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन मुख्यमंत्री तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडेही या प्रश्नासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!