हयात वृद्ध शेतकऱ्याला महसूल अभिलेखात दाखवले मृत; जमिनीच्या नोंदीत फेरबदलाचा आरोप
कुटुंबासह तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू करू, असा इशारा वृद्ध शेतकरी बाबू भांगरे यांनी दिला आहे.

अकोले – साकीरवाडी येथील ८२ वर्षीय वृद्ध शेतकरी बाबू भाऊ भांगरे यांना हयात असतानाही महसूल अभिलेखात मृत दाखवून त्यांच्या मालकीची शेतजमीन परस्पर अन्य व्यक्तींच्या नावे करण्यात आल्याचा गंभीर आरोप भांगरे कुटुंबीयांनी केला आहे. महसूल यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार करण्यात आल्याचा दावा करत, चुकीच्या नोंदी तातडीने रद्द करून जमीन मूळ मालक व कायदेशीर वारसांच्या नावे सरकारी खर्चाने पूर्ववत करावी, अशी मागणी महसूलमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
साकीरवाडी येथील बाबू भाऊ भांगरे यांच्या नावावर क्षेत्र खाते क्रमांक १८९ असून सामायिक खाते क्रमांक ५७ आहे. त्यांच्या मालकीचे सुमारे ४ हेक्टर ७५ आर क्षेत्र असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, गावात ‘बाबू भाऊ भांगरे’ या नावाचे तीन व्यक्ती असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत महसूल अभिलेखात चुकीच्या पद्धतीने फेरबदल करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
शेतजमिनीचे उतारे काढल्यानंतर हा धक्कादायक प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मालकीची जमीन ओम बबन भांगरे, भाऊ बबन भांगरे, मंगल बबन भांगरे, संगीत बबन भांगरे आणि संगीता बबन भांगरे यांच्या नावे करण्यात आली आहे.
याबाबत कुटुंबीयांनी संबंधित तलाठी प्रती धिगे यांची भेट घेऊन नोंदीबाबत विचारणा केली. माझे वडील हयात असताना त्यांना मृत दाखविण्यात आले. आम्ही त्यांचे कायदेशीर वारस असताना आमच्या जमिनीची नोंद परस्पर अन्य व्यक्तींच्या नावे कशी करण्यात आली? असा सवाल भांगरे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन प्रकरण कळविण्याचे तलाठी यांनी सांगितल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, जमीन ज्या व्यक्तींच्या नावे करण्यात आली आहे, त्यांच्याविरोधातही वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची महसूल प्रशासनाने निष्पक्ष व तातडीने चौकशी करून महसूल अभिलेखातील चुकीच्या नोंदी रद्द कराव्यात, तसेच जमीन मूळ मालक व त्यांच्या कायदेशीर वारसांच्या नावे पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महसूल प्रशासनाकडे आम्ही तक्रार दाखल केली आहे. आठ दिवसांत आमची जमीन पुन्हा आमच्या नावे करण्यात आली नाही, तर कुटुंबासह तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू करू, असा इशारा वृद्ध शेतकरी बाबू भांगरे यांनी दिला आहे.




