क्रांतिदिनी पुणे–नाशिक महामार्ग रेल्वेसाठी निर्णायक लढा; ९ ऑगस्टला जनआंदोलनाचे आवाहन
पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत हा लोकआंदोलनाचा लढा सुरू राहील...आमदार सत्यजीत तांबे

संगमनेर | सुदिन न्यूज नेटवर्क
पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाला गती मिळावी आणि केंद्र व राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी ९ ऑगस्ट (क्रांतीदिन) रोजी पुणे–नाशिक महामार्गावर व्यापक जनआंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे.
आंदोलनाच्या आयोजकांनी सांगितले की, पुणे–नाशिक रेल्वे मार्ग हा केवळ दोन शहरांना जोडणारा प्रकल्प नसून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची प्रतीक्षा सुरू असून विविध कारणांमुळे तो रखडला आहे. त्यामुळे आता जनतेने एकत्र येऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत पुणे–नाशिक प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत आहे. पूर्वी दोन ते तीन तासांत होणारा प्रवास वाहतुकीची कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे सहा ते सात तासांचा होत आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यापारी, उद्योजक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या रेल्वे मार्गामुळे सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल. पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच उद्योग, व्यापार, पर्यटन, कृषी आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल. नव्या गुंतवणुकीसह हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नसून भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, उद्योजक, कामगार, नोकरी करणारे, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षभेद विसरून या जनआंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.आयोजकांनी सरकारला इशारा देत सांगितले की, पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत हा लोकआंदोलनाचा लढा सुरू राहील. क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर होणारे हे आंदोलन पुणे–नाशिक रेल्वेच्या मागणीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.





