मेंढवण वीज उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करा!
आमदार अमोल खताळ यांची ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे मागणी

संगमनेर/ प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे मंजूर असलेल्या वीज उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करावे, मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच वारंवार नादुरुस्त होणारे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बदलून नवीन रोहित्र बसवावेत, अशा विविध मागण्या आमदार अमोल खताळ यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार खताळ यांनी मंत्रालयात ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तालुक्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये वीजपुरवठ्याच्या समस्या वारंवार उद्भवत आहेत. विशेषतः शेतीसाठी होणारा खंडित वीजपुरवठा, रोहित्र वारंवार नादुरुस्त होणे आणि आवश्यक ठिकाणी नवीन रोहित्र उपलब्ध न होणे, यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांचा शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याने वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार खताळ यांनी राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
मेंढवण येथे मंजूर असलेल्या वीज उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, जेणेकरून परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांना वीजेअभावी शेतीच्या कामांत अडथळे येऊ नयेत आणि नागरिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, यावरही त्यांनी भर दिला. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यात सुधारणा करून शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची भूमिका आमदार खताळ यांनी मांडली.






