चाणक्यनीतीतून यशाचा मार्ग; ‘अंकुर 2K26’मधून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची प्रेरणा- डॉ. धनंजय मंडलिक
संगमनेर येथे प्रथम वर्ष एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘अंकुर 2K26’ हा तीन दिवसीय स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.

संगमनेर (प्रतिनिधी) : केवळ पदवी मिळवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट नसून नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करणे महत्त्वाचे आहे. चाणक्यनीतीतील विचार आत्मसात करून कठोर परिश्रम, शिस्त आणि नैतिक मूल्यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी यशाचा मार्ग घडवावा, असे मार्गदर्शन पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय मंडलिक यांनी केले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (AIMBA), संगमनेर येथे प्रथम वर्ष एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘अंकुर 2K26’ हा तीन दिवसीय स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. ‘A New Beginning, A New Journey, A New You!’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यात आली
डॉ. मंडलिक यांनी बदलत्या व्यावसायिक वातावरणात आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचे ज्ञान, विश्लेषणात्मक विचार आणि व्यावहारिक अनुभव यांचे महत्त्व स्पष्ट केले. सह्याद्री अॅग्रोहॅचचे व्यवस्थापकीय संचालक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन हांसे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले.
या तीन दिवसीय उपक्रमात क्रीडा दिन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करून विद्यार्थ्यांना नियमित वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
समारोपप्रसंगी ‘मिस्टर फ्रेशर’ म्हणून मयूर सोनवणे, तर ‘मिस फ्रेशर’ म्हणून साक्षी भोसले यांची निवड करण्यात आली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांच्या हस्ते त्यांचा किताब व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘अंकुर 2K26’च्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, सौ. शरयू देशमुख, इंजि. भाऊ थोरात आणि संस्थेचे व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


संपादक – सुदिन राजेमाने




