ज्येष्ठ नेते मा.एकनाथराव खडसे यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम
माजी मंत्री बाळासाहेब थोरात

मुक्ताईनगर:(सुदिन न्यूज नेटवर्क)
माझे परममित्र, ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून त्यांचा सत्कार करण्याचा आणि त्यांना आनंदी, निरोगी व दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्याचा आज मला विशेष आनंद झाला.
या सुंदर सोहळ्यास देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि मान्यवर उपस्थिमाजी मानेत होते.
आज नाथाभाऊ आपल्या आयुष्याच्या ७५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा केवळ वाढदिवसाचा सोहळा नाही, तर त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील संघर्ष, कर्तृत्व, धडपड आणि जनसेवेचा गौरव करणारा हा एक अविस्मरणीय सोहळा आहे.
सरपंच पदापासून सुरू झालेली नाथाभाऊंची वाटचाल आज एका मोठ्या उंचीवर पोहोचली आहे. या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले, अनेक आव्हानांना सामोरे गेले; मात्र संघर्षाची साथ कधी सोडली नाही. जनसामान्यांशी असलेली त्यांची नाळ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
माझी आणि नाथाभाऊंची मैत्रीही अनेक दशकांची आहे. सन १९८५ मध्ये मी आमदार झालो आणि १९९० मध्ये नाथाभाऊ आमदार झाले. त्याच काळात आमची भेट झाली. त्यावेळी पुष्पाताई हिरे मंत्री होत्या. मतदारसंघातील विविध विषयांवर सकाळी फोन करण्यासाठी आम्ही एकत्र बसायचो. त्यातून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि आजपर्यंत आम्ही ही मैत्री तितक्याच जिव्हाळ्याने आणि विश्वासाने जपली आहे.
नाथाभाऊंची आमदारकी, मंत्रीपद आणि विरोधी पक्षनेतेपद मी अगदी जवळून पाहिले आहे. विशेषतः १९९५ ते १९९९ या काळात ते जलसंपदा मंत्री असताना कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. त्या काळात त्यांनी जलसंपदा विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय प्रभावीपणे हाताळले. तापी खोरे विकासाला चालना मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांचा सातत्याने आग्रह राहिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि त्यांच्या हक्कासाठी आग्रही असलेला नेता म्हणून मी त्यांना त्या काळात जवळून पाहिले आहे.
आम्ही मंत्री असताना नाथाभाऊ विरोधी पक्षनेते होते. तो काळही वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा होता. विरोधी पक्षनेत्याची भूमिका कशी प्रभावीपणे पार पाडावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाथाभाऊ. विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि तासन्तास भाषणे करण्याची त्यांची क्षमता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. सभागृहातील प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून तो ठामपणे मांडण्याची त्यांची शैली आजही लक्षात राहते.
सरपंचापासून आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास आहे. मात्र एवढी मोठी उंची गाठूनही जनसामान्यांशी असलेले त्यांचे नाते कायम राहिले. म्हणूनच नाथाभाऊ हे केवळ राजकारणी नाहीत, तर जनमानसात पोहोचलेला आणि जनमाणसातला माणूस आहेत.
आज नाथाभाऊ यांचा अमृत महोत्सव देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते साजरा होत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
नाथाभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, अनेक संघर्ष केले आणि त्यातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या या प्रदीर्घ वाटचालीचा गौरव होताना मला मनापासून आनंद होत आहे.
नाथाभाऊंना पुढील आयुष्य आनंदी, निरोगी, यशस्वी आणि समाधानाचे लाभावे. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांच्या हातून समाजाची व जनतेची अशीच अविरत सेवा घडत राहावी, हीच परमेश्वराच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना..




