Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़देशयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

दरबार नाही… व्यासपीठ आहे,नगरपालिका आपल्या सोबत आहे!

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या उपस्थितित १ ते २५ सप्टेंबरदरम्यान उपक्रम; नागरिकांच्या प्रश्नांसाठी हक्काचे व्यासपीठ

संगमनेर: दि. 30 ऑगस्ट 2026 : नागरिकांना आपल्या परिसरातील प्रश्न, समस्या आणि अडचणी थेट मांडता याव्यात, त्यावर संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी समोरासमोर चर्चा व्हावी तसेच मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करता यावी, यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने १ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रभागनिहाय समित्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, प्रत्येक प्रभागातील नागरिकांना आपल्या परिसरातील प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यावर प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपालिकेतील संगमनेर सेवा समितीच्या गटनेत्या दीपाली पंचारिया यांनी दिली.

सर्वसामान्य नागरिकांना आपल्या परिसरातील छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी वारंवार नगरपालिका कार्यालयात येण्याची गरज पडू नये, संबंधित विभाग कोणता याचा शोध

घेत कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि आपल्या प्रश्नाचे पुढे काय झाले यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागू नये, या भूमिकेतून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे येण्यापेक्षा नगरपालिका प्रशासनाने नागरिकांपर्यंत पोहोचावे, हा या संपूर्ण उपक्रमाचा केंद्रबिंदू असणार आहे.

या बैठका म्हणजे कोणताही ‘जनता दरबार’ नसून नागरिकांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिक हे केवळ आपल्या समस्या घेऊन प्रशासनाकडे येणारे याचक नसून शहराच्या विकासप्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचे भागीदार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रश्न मोकळेपणाने मांडावेत, संबंधित अधिकारी व नगरसेवकांनी ते प्रत्यक्ष समजून घ्यावेत, त्यावर खुली चर्चा व्हावी आणि शक्य त्या प्रश्नांबाबत पुढील कार्यवाही त्याच ठिकाणी निश्चित व्हावी, अशा पद्धतीने या बैठकांचे स्वरूप ठेवण्यात आले आहे.

‘दरबार नाही… व्यासपीठ आहे, नगरपालिका आपल्या सोबत आहेत!’ ही या उपक्रमामागची भूमिका असून, नागरिक आणि नगरपालिका यांच्यातील अंतर कमी करून परस्पर संवाद आणि विश्वास अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.

नागरिकांनी बैठकीला येताना केवळ तोंडी तक्रार मांडण्याऐवजी आपल्या समस्येबाबत शक्य तितकी नेमकी माहिती सोबत आणावी. आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रे, यापूर्वी केलेला पत्रव्यवहार, अर्ज, छायाचित्रे किंवा प्रश्नांची लेखी यादी आणावी. त्यामुळे संबंधित प्रश्नाची नोंद करून त्यावर अधिक जलद आणि परिणामकारक कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य होईल. प्रत्येक प्रश्नाची व्यवस्थित नोंद घेऊन तो संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, अतिक्रमण,उद्याने, नागरी आरोग्य, तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित इतर नागरी सुविधांबाबतचे प्रश्न या बैठकीत मांडता येणार आहेत. प्रत्येक प्रभागातील स्थानिक स्वरूपाच्या समस्यांसोबतच त्या भागाच्या भविष्यातील विकासासंदर्भातील सूचना आणि कल्पनादेखील नागरिकांना मांडता येणार आहेत.

विशेष म्हणजे, या बैठकांमध्ये संबंधित प्रभागातील नगरसेवकांसोबत नगरपालिका अधिकारीही प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एखादा प्रश्न फक्त ऐकून घेण्यापुरता मर्यादित न राहता तो कोणत्या विभागाशी संबंधित आहे, त्यावर काय उपाययोजना करता येईल, कोणत्या स्तरावर निर्णय घेणे आवश्यक आहे आणि पुढील कार्यवाही कशी होईल, याबाबत नागरिकांना थेट माहिती मिळू शकेल.

प्रश्न ऐकणे – त्याची नोंद करणे – जबाबदारी निश्चित करणे – कार्यवाही सुरू करणे – आणि त्याचा पाठपुरावा करणे, अशा पद्धतीने हा उपक्रम अधिक परिणामकारक करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे. केवळ समस्या मांडून बैठक संपविण्याऐवजी त्या प्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल त्याच बैठकीत निश्चित व्हावे, यावर भर दिला जाणार आहे.

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार नागरिकांशी सातत्याने थेट संवाद साधणे आणि त्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करणे, ही नगरपालिकेच्या कामकाजाची पद्धत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहराचा विकास हा केवळ नगरपालिका प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींचा विषय नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच अधिक चांगले शहर घडू शकते, या विचारातून प्रभागनिहाय संवादाला महत्त्व देण्यात आले आहे.

नगरपालिका कार्यालयात नागरिकांनी येण्याची वाट पाहण्याऐवजी अधिकारी आणि नगरसेवकांनी नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचणे, त्यांच्यासोबत बसून प्रश्न समजून घेणे आणि उपलब्ध यंत्रणेच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद जितका थेट आणि नियमित असेल, तितक्या वेगाने शहरातील प्रश्न सोडविणे शक्य होईल, अशी भूमिका नगरपालिकेने घेतली आहे.

प्रभागनिहाय बैठकीमुळे प्रत्येक भागातील प्रश्नांचे स्वतंत्र स्वरूप प्रशासनासमोर येणार असून, त्यातून शहरातील कोणत्या भागात कोणत्या नागरी सुविधांवर प्राधान्याने काम करण्याची आवश्यकता आहे, याचेही स्पष्ट चित्र निर्माण होणार आहे. त्यामुळे या बैठका केवळ तक्रार निवारणापुरत्या मर्यादित न राहता संगमनेरच्या पुढील विकासाच्या नियोजनासाठी नागरिकांचा थेट सहभाग असलेले व्यासपीठ ठरणार आहेत.

१ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या या प्रभागनिहाय बैठकींमध्ये सर्व प्रभागांतील नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रश्न, सूचना आणि अपेक्षा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांनी पालिकेच्या दारी नव्हे, नगरपालिका नागरिकांच्या दारी — नागरिकांचे प्रश्न ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी या काळात अधिकारी आणि नगरसेवक आपल्या सोबत असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!