सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई
सात जणांवर तडीपारीची कारवाई; आणखी २५ सराईत आरोपी पोलिसांच्या रडारवर

संगमनेर (सुदिन न्यूज नेटवर्क)
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभाग पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सात जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, संगमनेर शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आणखी २५ आरोपींविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संगमनेर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील गुन्हेगारांचा आढावा घेण्यात आला. वारंवार गुन्हे करणाऱ्या तसेच ज्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये तडीपारीची प्रक्रिया राबविण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या आदेशानुसार संबंधित तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर विभाग यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार निलेश राजेंद्र काथे, सिद्धार्थ उर्फ सिद्धांत दीपक मावस, संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे, निलेश रामदास आरोटे, महेंद्र बाबासाहेब निळे, अजमत लतीफ कुरेशी आणि सुयोग अशोक दवंगे या सात जणांविरुद्ध तडीपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
यापैकी निलेश काथे व सिद्धार्थ मावस यांना ८ सप्टेंबर २०२६ ते ७ सप्टेंबर २०२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी, तर संपत उर्फ प्रशांत गागरे याला ८ सप्टेंबर २०२६ ते ७ सप्टेंबर २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. निलेश आरोटे याच्यावर सहा महिन्यांची तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, महेंद्र निळे यालाही एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तसेच अजमत कुरेशी व सुयोग दवंगे यांच्याविरुद्धही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
तडीपारीच्या आदेशानुसार संबंधितांना अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्धची ही प्रतिबंधात्मक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आणखी २५ आरोपींचे तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर, संगमनेर तालुका व अकोले पोलीस ठाण्यांच्या पथकांनी केली.




