दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई लोकशाहीला धक्का; माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका
संगमनेरमध्ये भव्य मशाल मोर्चा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग



संगमनेर: (सुदिन न्यूज नेटवर्क)
दिल्लीमध्ये नीट परीक्षा प्रकसंगमनेर रणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाही मूल्यांवर आघात करणारी असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
थोरात म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी दडपशाहीची भूमिका स्वीकारली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. नीट परीक्षा प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य असून, त्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही व्यवस्थेत विरोधी मतांचा सन्मान राखला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा योग्य नसून, सरकारने संवादातून मार्ग काढावा, असे थोरात यांनी नमूद केले.
संगमनेरमध्ये भव्य मशाल मोर्चा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संगमनेर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता संगमनेर बसस्थानक येथून भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विद्यार्थी, पालक, युवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी सहभागी आंदोलकांनी केली.