Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
Uncategorized

मातोश्रींसमवेत दिंडीत रमले आमदार अमोल खताळ

संगमनेर :(सुदिन न्यूज नेटवर्क)
आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र माणकेश्वर आणि श्रीक्षेत्र बाळेश्वर पायी दिंडीसोहळ्यात आमदार अमोल खताळ यांनी आपल्या मातोश्रींसमवेत सहभाग नोंदविला. पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे त्यांनी गळ्यात टाळ, हातात वीणा घेऊन हरिनामाच्या अखंड गजरात वारकऱ्यांसोबत काही किलोमीटर पायी चालत विठ्ठलभक्तीचा आनंद अनुभवला.
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी दिंड्यांसह पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र माणकेश्वर व श्रीक्षेत्र बाळेश्वर या दिंड्यांचाही उत्साहपूर्ण सहभाग आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये भक्तिभाव, समर्पण आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
यावेळी आमदार खताळ यांनी दिंडीत सहभागी झालेल्या ज्येष्ठ वारकरी बांधवांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. गेल्या २७ वर्षांपासून अखंड पायी वारी करणाऱ्या आपल्या मातोश्रींसमवेत दरवर्षीप्रमाणे यंदाही काही अंतर पायी चालण्याचा योग साधला. हरिनामाच्या गजरात सहभागी होत त्यांनी वारकरी परंपरेतील समता, सेवा आणि भक्तीभावाचा अनुभव घेतला.
वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपासून भक्ती, सेवा, समता, शिस्त आणि सामाजिक ऐक्याची महान परंपरा जपली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही वारकरी बांधवांच्या सहवासात पायी वारी करण्याचे आणि विठुरायाच्या दर्शनाचे भाग्य लाभले, हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे. वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम यांच्यामुळेच मला लोकसेवेची संधी मिळाली. महाराष्ट्रातील संतपरंपरा आणि वारकरी चळवळीचा हा अखंड दीप असाच तेवत राहो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!